Breaking
ब्रेकिंग

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसूती विभागात खाटा वाढवल्या* • *स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालयातील एम एम व्हॅली प्रसूतिगृह होणार अद्ययावत* • *जलद कार्यवाही करण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश*

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे (३१) :* ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसूती विभागात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेऊन तेथील खाटांची संख्या वाढवून ९० करण्यात आली आहे. त्याशिवाय, मुंब्रा येथील प्रसूतिगृहाकडून येणाऱ्या रुग्णांचा ओघ लक्षात घेऊन स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालयातील एम एम व्हॅली प्रसूतिगृहास छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या विस्तारीत केंद्राचा दर्जा देऊन तेथे अद्ययावत प्रसूतीशास्त्र विभाग पूर्ण स्वरूपात लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूती शास्त्र विभागात दररोज सुमारे २०० बाह्य रुग्ण येतात. तसेच, प्रसूती पश्चात कक्षात आता एकूण ७० खाटा उपलब्ध आहेत. उपरोक्त विभागात दररोज सरासरी १८ प्रसुती होतात. ऑक्टोबर २०२५ मध्ये दररोज २२ प्रसूती झाल्या. त्याचबरोबर, बहुतांश वेळा उपरोक्त कक्षात एकूण ९८ महिला दाखल होत्या. रुग्णालयात ठाणे महानगरपालिका क्षेत्र तसेच आजूबाजूच्या क्षेत्रातून तसेच ठाणे ग्रामीण व पालघर ग्रामीण क्षेत्रातून महिला प्रसूतीसाठी येतात. त्यामुळे बहुतांश वेळा खाटा पूर्णपणे भरलेल्या असतात. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासंदर्भात, शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट आणि रुग्णालय अधिक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर उपस्थित होते.

या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसूतीविभागावर येत असलेल्या ताणाची सविस्तर चर्चा झाली. त्याची कारणमिमांसा करताना दरमहा सुमारे १०० प्रसूतीपूर्व महिला या स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालय येथील प्रसूतीगृहातून पाठवल्या जात असल्याचे निदर्शनास आले. या प्रसुतीगृहात आप्तकालीन सिझेरियन सेक्शन शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिल्यास तेथून प्रसूतीसाठी महिलांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवणे कमी होईल, त्यातून प्रसूती विभागावर असलेला ताण कमी होऊन तेथे खाटा उपलब्ध होतील, असे अधिष्ठाता डॉ. बारोट यांनी सांगितले.

त्यानुसार, स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालय येथील प्रसूतीगृहात लवकरात लवकर अद्ययावत प्रसूती सुविधा सुरू करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ नियुक्त करणे, साधनसामुग्री घेणे आदी कामांचा आराखडा सोमवारी सादर करावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. हा प्रसूतीविभाग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे विस्तारीत केंद्र म्हणून जलद सुरू करण्याचेही स्पष्ट निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे