टोरंटचा आडमुठेपणा, टोरेंट पॉवरच्या मनमानी कारभारा विरोधात दिवा मनसे आक्रमक..
अमित जाधव - संपादक
टोरेंट पॉवरच्या मनमानी कारभारा विरोधात दिवा मनसे आक्रमक,मनसे स्टाईल अवलंबणार
टोरेंट पॉवर कडून दिवा शहरातील नागरिकांना चुकीच्या पद्धतीने वेठीस धरले जात असल्याचे दिवा मनसे कडून सांगण्यात आले आहे. टोरेंट पॉवर कडून घेतल्या जाणाऱ्या आडमुठेपणामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. नोटीस किंवा आगाऊ पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन तोडणे, ग्राहकांशी उद्धटपणे बोलणे, हिंदू सणांच्या काळात वीज बंद ठेवणे, घरातील विज कनेक्शन कापण्यापूर्वी बिल भरल्याची शहानिशा न करणे, मीटर साठी मागणी करूनही वेळेवर मीटर उपलब्ध न करून देणे या सारख्या अनेक तक्रारी या टोरेंट पॉवर बद्दल दिवा मनसे शहर कार्यालयात आल्या होत्या.
वीज कनेक्शन तोडायला जाणाऱ्या पथकासंदर्भात लोकांच्या सगळ्यात जास्त तक्रारी येत असतात. घरात व्यक्ती उपलब्ध असूनही त्याला न सांगता वीज कापून निघून जाणे, वीज पुरवठा खंडित करत असताना त्याची माहिती न देणे अशा गोष्टी टोरेंट कर्मचाऱ्यांकडून केल्या जातात. अनेकवेळा ग्राहकाने मिटरसाठी पैसे भरूनही चार ते सहा महिने मीटर बसवले जात नाही, त्याच काळात व्हिजिलन्स वाले संबंधित ग्राहकांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल करतात आणि त्याला लाख रुपयांचा दंड ठोठावतात. या सगळ्या प्रकारात त्या ग्राहकांची काहीही चुकी नसताना त्याला आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. याउपर टोरेंट पॉवर चे कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणे बोलतात त्यामुळे जर टोरेंट पॉवर प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांशी विनम्रपणे बोलण्याच्या योग्य त्या सूचना न दिल्यास त्यांना मनसे आपल्या स्टाईलने दिव्यात धडा शिकवेल असा इशारा दिला मनसेचे शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी टोरेंट प्रशासनाला दिला.



