ठामपा पुरस्कृत ‘उत्सव 75 ठाणे’ महोत्सवाचे उद्या होणार शानदार उद्घाटन….
अमित जाधव-संपादक
*ठामपा पुरस्कृत ‘उत्सव 75 ठाणे’ महोत्सवाचे आज होणार शानदार उद्घाटन*
ठाणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे शहरात ठाणे महानगरपालिका व शहरातील 60 सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या उत्सव 75 ठाणे या महोत्सवाचे शानदार उद्घाटन उद्या शुक्रवार दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी सायं. 6.00 वा. राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशासक तथा ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या शुभहस्ते, उत्सव ठाणे 75 चे स्वागताध्यक्ष नरेश गणपत म्हस्के यांच्या स्वागताध्यक्षेखाली होणार असून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे उपस्थित राहणारआहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचे औचित्य साधून देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या तीनही दलांचे माजी सैनिक उपस्थित राहणार आहेत.
ठाणे महापालिका पुरस्कृत असलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी ठाणे, ठाणे पोलीस दल यांच्यासह पर्यटन मंत्रालय भारतसरकार यांचाही सहभाग आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनापूर्वी सायंकाळी 6.00 वा. दीपप्रज्वलन व शहनाई वादनाने कार्यक्रमाची सुरूवात होईल. त्यानंतर तबला व तालवाद्यांचा ‘नादवैभव’ हा कार्यक्रम पं. मुकुंदराज देव आणि सहकलाकार सादर करतील. उत्सव ठाणे 75 चे स्वागताध्यक्ष नरेश म्हस्के हे प्रास्ताविकपर भाषण करतील. तद्नंतर मान्यवरांच्या उपस्थिती 7.00 वा. कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. मान्यवरांच्या मनोगतानंतर माजी व्हाईस अडमिरल एस.व्ही. भोकरे, माजी एअर मार्शल अरूण गरुड, माजी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निभोरकर यांच्या प्रकट मुलाखती मुलाखतकार अशोक वानखेडे घेणार आहे.
या महोत्सवाच्या आयोजनात 60 हून अधिक संस्थांचा सहभाग आहे. या सर्व संस्थांचे प्रतिनिधी तसेच ठाणेकर नागरिकांनी या दिमाखदार सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे स्वागताध्यक्ष नरेश म्हस्के यांनी केले आहे.


