जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, नॅान क्रिमिलेयर, रहिवास आदी दाखले आता शाळा आणि महाविद्यालयात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय…तहसीलदार युवराज बांगर
अमित जाधव - संपादक
ठाणे, दि. 2 (प्रतिनिधि)* :- महसूल सप्ताहानिमित्त आज ठाणे तहसील कार्यालयाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना महसूल संबंधी माहिती देण्यात आली. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या दाखल्यांचे वाटपही करण्यात आले.
ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला असून या अंतर्गत आज युवा संवाद कार्यक्रमाचे जिल्ह्यात आयोजन करण्यात आले होते. ठाणे तहसीलदार कार्यालयाच्यावतीने कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तहसीलदार युवराज बांगर, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून महसूल प्रशासनाविषयी तसेच देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांविषयी माहिती दिली. विविध दाखले घेण्यासाठी येणाऱ्या समस्या, अडचणींविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
तहसीलदार श्री. बांगर म्हणाले की, महसूल विभागाने या सप्ताहात विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात लागणाऱ्या आवश्यक जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, नॅान क्रिमिलेयर, रहिवास आदी दाखले आता शाळा आणि महाविद्यालयात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आज दाखले वाटप करण्यात आले.
०००००००००



