*⭕️ठाणे महानगर पालिकेची प्रभाग रचना व प्रभागांच्या सीमा जाहीर.*
१४ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत हरकती व सूचना सादर करण्याची मुदत
ठाणे (१ फेब्रु, संतोष पडवळ ) : ठाणे महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रारूप प्रभाग रचना व निवडणूक प्रभागांच्या सीमा आज दिनांक १ फेब्रुवारी, २०२२ रोजी महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्या असून यावर हरकती व सूचना सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ठाणे महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी बहुसदस्यीय प्रभाग रचनेस मान्यता दिलेली असून निवडणूक प्रभागांच्या सीमा जाहीर करुन हरकती सूचना मागविणे व सुनावणी देण्याचा कार्यक्रम निश्चित करुन देण्यात आलेला आहे. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ४७ प्रारूप प्रभाग रचना व निवडणूक प्रभागांच्या सीमा जाहीर करण्यात आल्या आहेत.
सदरची प्रभाग रचना व प्रभागांच्या सीमा महापालिकेच्या https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच महापालिका भवन येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह व सर्व प्रभाग समिती कार्यालय येथेही नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदरच्या प्रारूप प्रभाग रचना व निवडणूक प्रभागांच्या सीमाबाबत हरकती व सूचना सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. या हरकती महानगरपालिका आयुक्त, निवडणूक कार्यालय अथवा माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती, वर्तकनगर प्रभाग समिती, लोकमान्यनगर- सावरकरनगर प्रभाग समिती, वागळे प्रभाग समिती, नौपाड़ा – कोपरी प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती व दिवा प्रभाग समिती या प्रभाग कार्यालयांमध्ये सादर कराव्यात असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरीकांना सुनावणी करीता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.


