ठाणे महापालिकेकडून शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण,ठाणे,मुब्रा,कळवा ,दिवा एकूण 4397 धोकादायक इमारतींची नोंद…..
अमित जाधव-संपादक
*ठाणे महापालिकेकडून शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण,ठाणे,मुब्रा,कळवा दिवा एकूण 4397 धोकादायक इमारतींची नोंद……*
ठाणेण महापालिकेकडून शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले असून नऊ प्रभागांमध्ये ४ हजार ३९७ धोकादायक इमारतींची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी शहरात ४ हजार ५२३ धोकादायक इमारतींची नोंद झाली होती. त्यापैकी १२६ इमारतींची संख्या घटली असल्याचे नव्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.धोकादायक इमारतींपैकी अतिधोकादायक गटात ७१ इमारतींचा समावेश झाला असून या इमारती तत्काळ रिकाम्या करण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेकडे पर्यायी जागा नसल्याने अनेक रहिवाशांना अशा धोकादायक इमारतींमध्येच जीव मुठीत घेऊन राहावे लागणार आहे.
पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी होण्याचे प्रकार वाढल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकांकडून धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते. प्रभाग समितीनिहाय धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून प्रशासनाकडून या संदर्भातील माहिती नागरिकांना दिली जाते. सी१ या अतिधोकादायक प्रकारामध्ये शहरातील ७१ ते ७२ इमारती असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या इमारती तत्काळ रिकाम्या करून रहिवाशांना पर्यायी जागी स्थलांतरित करण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु महापालिकेकडे नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी पर्यायी घरे नाहीत. यामुळे अनेक रहिवासी धोकादायक इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन राहत असल्याचे दिसून येत आहे.
धोकादायक इमारतींची नोंदीमध्ये मुंब्रा प्रभागात १,३७२, वागळेमध्ये १,०८२, दिवा प्रभागात ७४२, नौपाडा-कोपरी ४५३, लोकमान्य-सावरकरनगर २२१, कळवा १८३, उथळसर १३८, माजीवडा मानपाडा १४५ तर वर्तकनगरमध्ये ६१ इमारतींचा समावेश आहे.


