दिव्यातील बेकायदेशीर खासगी रुग्णालय आरोग्य विभागाने केले कायमस्वरूपी बंद. *येत्या काहिदिवसात दिव्यातील अनेक बेकायदेशीर रूग्णालय होणार बंद… ठाणे आरोग्य विभाग
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता ८ मार्च : दिवा शहरामध्ये मागील काही वर्षांपासून सुरू असलेले मुंब्रादेवी कॉलनी येथील आशीर्वाद हॉस्पिटल यांच्याकडे आरोग्य विभागाची नोंदणी परवाना नसताना देखील शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून हे हॉस्पिटल दिवा शहरात राजरोसपणे सुरू होते. आपतकालीन प्रसंगी रुग्णालया जवळ रुग्णवाहिका किंवा अग्निशामक दलाची गाडी पोहचू शकत नव्हती. संबंधित विषयाची दखल घेत विकास जगताप यांनी सदर हॉस्पिटल संबंधी तक्रार दाखल केली परंतु तक्रारीवर कोणतेही स्वरूपाची कारवाई होत नसल्याचे निदर्शनास येतास विकास जगताप यांनी मुंबई आझाद मैदान येथे उपोषण करून बेकायदेशीर असलेले आशीर्वाद हॉस्पिटल बंद करण्यास भाग पाडले.
शासनाची फसवणूक करून गोरगरीब भूमिपुत्रांना ( रुग्णांना ) लुटणाऱ्या व रुग्णांच्या जीविताशी खेळणाऱ्या हॉस्पिटल विरोधात कारवाई होणे गरजेचे होते. सदर बेकायदेशीर असलेले आशीर्वाद हॉस्पिटल बंद झाल्यामुळे दिवा शहरांमधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिव्यातील अनेक बेकायदेशीर रूग्णालय आमच्या रडार वर असून लवकरच ठोस कारवाई करण्यात येईल असे ठाणे महापालिका आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.