डोंबवलीत जनकल्याण पतपेढीत बनावट सोने तारण ठेऊन पतपेढीची साढे सहा लाखाची मोठी फसवणूक…..*
अमित जाधव-संपादक
डोंबवलीत जनकल्याण पतपेढीत बनावट सोने तारण ठेऊन पतपेढीची साढे सहा लाखाची मोठी फसवणूक…..*
हितेंद्र ओमप्रकाश सोनी, ओमप्रकाश रमेशकुमार सोनी (रा. वर्षा सोसायटी, कर्वे रोड, भागशाळा मैदान, डोंबिवली पश्चिम) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, हितेंद्र सोनी यांनी डिसेंबर २०१८ मध्ये जनकल्याण नागरिक सहकारी पतपेढीच्या डोंबिवली पश्चिमेतील शाखेत संपर्क साधला. आपणास कर्जाची गरज आहे. जवळील सोने तारण ठेऊन आपण कर्ज घेणार आहोत, असे पतपेढीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. हितेंद्र सोनी यांनी २१६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने यामध्ये एक सोनसाखळी आणि दहा बांगड्या असा ऐवज पतपेढीतील कर्ज विभागाच्या तारण म्हणून स्वाधीन केला. हा सोन्याचा ऐवज खरा आहे. या सोन्याच्या मूल्यमापनाचा अहवाल ओमप्रकाश सोनी यांनी पतपेढीला दिला. हितेंद्र आणि ओमप्रकाश यांनी संगनमत करून सोने तारण ठेवणे आणि मूल्यमापन अहवाल देणे ही कामे केली.
या तारण सोन्यावर पतपेढीने अधिकाऱ्यांनी हितेंद्र सोनी यांना पाच लाख ५० हजार रूपयांचे कर्ज दिले. सोनी यांनी नंतर कर्जाचे हप्ते फेडण्यास टाळाटाळ केली. तारण सोने पतपेढीच्या खात्यात वर्ग करून कर्जाऊ रक्कम वसूल करू, असा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. अधिकाऱ्यांनी या सोन्याच्या अस्सलतेची तज्ज्ञ सोनाराकडून तपासणी केली. त्यावेळी हे सोने बनावट आहे असे अधिकाऱ्यांना समजले. हा विषय सोनी यांच्या निदर्शनास आणण्यात आला. त्यांनी यासंदर्भात उदासीनता दाखवली. सोनी बंधूंनी बनावट सोने पतपेढीत तारण ठेऊन पतपेढीची फसवणूक केली म्हणून जनकल्याण नागरीक सहकारी पतपेढीचे सचिव अरविंद शिवराम साळकर यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक गणेश खंदारे तपास करत आहेत.


