दिवा अपघातानंतर ही रेल्वे रूळ ओलांडून नागरिकांचा प्रवास,रेल्वे विभाग कडून कोणतीही कारवाई नाही- दिवा रेल्वे प्रवासी संघटना……
अमित जाधव-संपादक
दिवा अपघातानंतर ही रेल्वे रूळ ओलांडून नागरिकांचा प्रवास….
ठाणे : दिवा रेल्वे स्थानकात रेल्वे फाटक ओलांडताना उपनगरीय रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेस आठवडा उलटला नसताना पुन्हा हा रेल्वे फाटक ओलांडण्यास प्रवाशांकडून सुरुवात झाली आहे. जिने चढण्यास ‘कष्ट’, तिकीट घराची असुविधा, पादचारी पूल उतरताना अरुंद जिने यामुळे अनेक जण रेल्वे रूळ ओलांडत असल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे, रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारीही या परिसरात उभे असतात. त्यांच्याकडूनही या प्रवाशांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे दिवा रेल्वे फाटकातून रूळ ओलांडताना आणखी किती प्रवाशांचे बळी जाणार असा प्रश्न प्रवासी संघटनांकडून विचारला जात आहे.
दिवा रेल्वे स्थानकाजवळील फलाटामधून ये-जा करत असताना अनेकांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू ओढवला आहे. तर काहींना कायमचे जायबंद व्हावे लागले आहे. त्यामुळे हा रेल्वे फाटक बंद करण्यासाठी ठाणे महापालिका आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून एक रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. अनेक तांत्रिक अडचणीमुळे हे काम रखडलेले आहे. तर, रेल्वेने प्रवाशांसाठी फाटकाजवळ एक पादचारी पूल उभारला आहे. पूल बांधला असतानाही या पादचारी पूलावरील चढ-उतर करण्यासाठी असलेले जिने हे अत्यंत अरूंद आहेत. त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या वेळी गर्दी झाल्यास या जिन्यावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. तर काही प्रवासी हे दुपारच्या वेळेत पुलावर गर्दी नसतानाही शॉर्टकटसाठी किंवा जिने चढण्याचे कष्ट टाळण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत आहेत. हा सर्व प्रकार रेल्वे सुरक्षा दलाच्या डोळय़ांदेखत होत असतानाही रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी कर्मचारी या प्रकाराकडे बघ्याची भूमिका घेत आहेत.
या संदर्भात रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता, फाटकातून रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी जनजागृती करत असतो. त्यानंतरही प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत आहेत. तसेच रुळ ओलांडणाऱ्यांचे प्रमाण हे खूप अधिक असते. या प्रवाशांपुढे आमचे मनुष्यबळ कमी पडते असेही त्यांनी सांगितले.
दिवा रेल्वे स्थानकातील मुख्य तिकीटघर हे पश्चिमेला आहे. पूर्वेकडे राहणाऱ्या एखाद्या प्रवाशाला तिकीट किंवा मासिक पास काढायचे असल्यास त्या प्रवाशाला जिना चढून पश्चिमेकडील तिकीट घराच्या परिसरात जावे लागते. तिकीट काढल्यानंतर पुन्हा त्या प्रवाशाला स्थानकात येण्यासाठी जिने चढावे लागतात. हा प्रकार टाळण्यासाठीही प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असतात.दिवा रेल्वे स्थानकातील अरुंद जिने, महत्त्वाच्या ठिकाणी सरकते जिन्याची सोय नसणे आणि चुकीच्या ठिकाणी असलेले तिकीट घर यामुळे प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत आहेत. प्रशासनाने या प्रश्नांची सोडवणूक केल्यास प्रवासी नक्कीच पूलाचा वापर करतील.असे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे आद्यक्ष आदेश भगत यांनी सांगितले.