ठाण्यात ऑनलाइन खाद्य पदार्थ मागवणे महिलेला पडले महागात,10 लाखाहून अधिक मुद्देमाल घेऊन स्वीगीचा चोर डिलिव्हरी बॉय फरार…
अमित जाधव-संपादक
ठाण्यात ऑनलाइन खाद्य पदार्थ मागवणे महिलेला पडले महागात
10 लाखाहून अधिक मुद्देमाल घेऊन स्वीगीचा चोर डिलिव्हरी बॉय फरार….
ठाण्यात ऑनलाईन ऑर्डर घेऊन आलेल्या एका तरुणाने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून चाकूचा धाक दाखवत सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने आणि काही रोकड असा एकूण १० लाखाहून अधिकचा मुद्देमाल लुबाडून पोबारा केल्याची घटना घडली आहे. भर दिवसा ही घटना घडल्यामुळे परिसरात एकच घबराटीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नौपाडा पोलीस करत आहेत.
सध्या सगळीकडे ऑनलाईनचा जमाना आला आहे. सुईपासून ते मशीनपर्यंत आणि किराणापासून ते खाद्य पदार्थांपर्यंत सर्व वस्तू घरबसल्या मोबाईलवरून मागवता येतात. त्यामुळे आजकाल बहुतेक जण विविध हॉटेलमधून खाद्य पदार्थ स्वीगी किंवा झोमॅटोच्या माध्यमातून ऑनलाईन ऑर्डर करतात. ठाण्यातील नौपाडा येथील पाचपाखाडी परिसरातील ३९ वर्षीय एका महिलेने देखील अशा प्रकारे घरबसल्या स्वीगीच्या माध्यमातून ऑनलाईन खाद्य प्रदार्थ ऑर्डर केली. काही वेळाने स्वीगी बॉय ही ऑर्डर घेऊन महिलेच्या घरी पोहचला. त्यानंतर महिला घरी एकटीच असल्याचा अंदाज घेत, या स्वीगी बॉय ने महिलेकडे पिण्यासाठी पाणी मागितले. महिला पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेली असता या स्वीगी बॉयने घरात घुसून महिलेच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. चाकूचा धाक दाखवत या स्वीगी बॉयने महिलेला बेडरूममध्ये नेवून कपाटात ठेवलेले सोन्या – चांदीचे आणि हिऱ्याचे दागिने तसेच काही रोक रक्कम असा एकूण १० लाख २० हजारांचा मुद्देमाल लुबाडून तेथून पोबारा केला.सादर प्रकरणी नौपाडा पोलीस पुढील तपास करत असून लवकरच आरोपीला अटक करू असे स्पष्ट केले.