डिसेंबर २०२२ अखेरीस कार्यान्वित होणार दीघा स्टेशन.
खासदार राजन विचारे यांनी आज दिघा रेल्वे स्थानकाची पाहणी केली यावेळी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनचे मुख्य अधिकारी रवी अग्रवाल, प्रकल्पाचे मुख्य अधिकारी राजाराम राठोड, नवी मुंबई महानगरपालिकेचे इंजीनीअर संजय पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
मध्य आणि हार्बर मार्गाला जोडणार्या दिघा स्थानकाची घोषणा २०१४ साली झाली होती.
या स्थानकासाठी ४२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिघा रेल्वे स्थानकाचे भूमीपुजन झाले होते. भूमी अधिग्रहणामुळे या प्रकल्पाला विलंब होत होता.
त्यामुळे हा प्रकल्प दोन टप्प्यांत विभागला गेला. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होत आले आहे.
दिघा रेल्वे स्थानकाचे ६० टक्के काम झाल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली आहे. तसेच स्थानकावर दोन फलाट असून त्यांची लांबी २७० मीटर आणि रुंदी १२ मीटर असणार आहे. स्थानकावर लिफ्ट आणि चार सरकते जिने असणार आहे असेही विचारे यांनी सांगितले.
या रेल्वे स्थानकासाठी ११० कोटी रुपयये खर्च होणार आहे. दिघा रेल्वे स्थानक दोन मजली असणार आहे. स्थानकाच्या दोन्ही बाजूला चार तिकीट खिडकी आणि तिकीट बूकिंगचे ऑफिस असणार आहे. डिसेंबर अखेर या रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होईल आणि हे स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू होईल असेही विचारे म्हणाले.
या प्रकल्पाच्या दुसर्या टप्प्यात कळवा एलेव्हेटेड रेल्वे स्थानक बांधले जाईल. हा मार्ग दिघा स्थानकाला जोडला जाईल. या प्रकल्पामुळे १ हजार ८० नागरिकांचे पुर्नवसन करावे लागणार आहे. आतापर्यंत ९२४ घरे रिकामी झाले आहेत. हे कापूर्ण झाल्यानंतर लवकरच हा मार्ग पूर्ण होईल. कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूरहून येणार्या प्रवाशांना नवी मुंबईला जाण्यासाठी ठाण्याहून ट्रेन पकडावी लागते. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना कळवा स्थानकातून नवी मुंबईसाठी लोकल मिळणार आहे. या मार्गामुळे ठाणे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.