दिल्ली,दि. :-आता लवकरच डिजिटल मीडियाच्या नोंदणीसाठी नवा कायदा येणार आहे. प्रेस आणि नियतकालिकांच्या नोंदणी विधेयकात सुधारणा करण्याची प्रक्रियाही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सुरू करण्यात आली आहे. या नवीन विधेयकामध्ये डिजिटल न्यूज मीडियाचासुद्धा समावेश करण्यात येणार आहे.
देशातील कायद्यांमध्ये डिजिटल न्यूज मीडियासाठी करण्यात येणारा हा पहिलाच कायदा असेल. हा कायदा मंजूर झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत न्यूज पोर्टलची नोंदणी करावी लागणार आहे. वेबसाइटच्या मालकांना त्यांच्या वेबसाइटची नोंदणी प्रेस रजिस्टार जनरल यांच्याकडे करावी लागेल.
त्याचबरोबर कोणत्याही वेब साइटवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याचे सर्व अधिकारसुद्धा त्यांच्याकडे असतील आणि याच अधिकारानुसार ते कोणत्याही वेबसाइटची मान्यतासुद्धा रद्द करू शकतात किंवा त्यांना दंडही आकारू शकतात. त्याचबरोबर कोणतीही तक्रार निवारण्यासाठी मंडळदेखील स्थापन केले जाणार आहे. याचे प्रमुख हे प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाचे मुख्य अधिकारी हेच असतील.