झुंड’मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो चर्चेत, नागाराज मंजुळेंवर होतोय कौतुकाचा वर्षाव…..
अमित जाधव-संपादक
‘झुंड’मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो चर्चेत, नागाराज मंजुळेंवर होतोय कौतुकाचा वर्षाव_
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरु ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील ट्रेलरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट चर्चेत आहे.
झुंड या चित्रपटाचा ट्रेलर ३ मिनिटांचा आहे. यात २.१२ मिनिटाच्या एका दृश्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेली फ्रेम पाहायला मिळत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले चित्रपटातील त्या दृश्याची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. तसेच याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यावेळी अमिताभ बच्चन यांचा डायलॉगही प्रचंड गाजत असल्याचे दिसत आहे. “एका दगडात ही पोरं जनावर मारतात. जर त्यांच्या हातात बॉल दिला तर ते जगातील सर्वात वेगवान गोलंदाज होतील”, असा डायलॉग यावेळी अमिताभ बच्चन बोलताना दिसत आहे. दरम्यान सध्या प्रेक्षक या ट्रेलरचे कौतुक करताना दिसत आहेत.
झुंड हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.