डोंबवली ,कल्याण रिक्षा चोरीच्या घटनेत वाढ,शहरात रिक्षा चोरि करणारी टोळी सक्रिय असल्याची रिक्षाचालकांनी केल्या तक्रारी…..
अमित जाधव -संपादक
कल्याण- डोंबिवली, कल्याणमध्ये गेल्या काही दिवसांपासून रिक्षा चोरण्याचे प्रमाण वाढल्याने शहरात रिक्षा चोरणारी टोळी सक्रिय झाली असल्याच्या तक्रारी रिक्षा चालकांकडून केल्या जात आहेत. अनेक रिक्षा चालकांचे कुटुंब रिक्षा प्रवासी भाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर गुजराण करते. अशा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.डोंबिवली शीळफाटा, दहिसर मोरी परिसरात भंगाराची दुकाने वाढल्यापासून रिक्षा,दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे, असे रिक्षा चालकांनी सांगितले.चोरीला गेलेल्या सर्वच रिक्षांवर बँकांचे कर्ज आहे. कर्ज फेड सुरू असताना रिक्षा चोरीला गेल्याने रिक्षा चालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कल्याण मध्ये रामबाग मध्ये राहणाऱ्या मोहसिन खान (३१) यांची रिक्षा रामबाग गल्ली क्रमांक तीन मधून रात्रीच्या वेळेत रस्त्यालगत उभी करून ठेवली असताना चोरून नेण्यात आली. डोंबिवली पश्चिमेत घनश्याम गुप्ते रस्ता गावदेवी भागात राहणाऱ्या कमलेश यादव यांची रिक्षा रात्रीच्या वेळेत चोरून नेली आहे. सिध्दार्थनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या विशाल गरूड, देवीचापाडा सत्यवान चौकात राहणाऱ्या रवींद्र जाधव यांच्याही रिक्षा चोरून नेण्यात आल्या आहेत.
डोंबिवली जवळील कल्याण शीळफाटा, दहिसर मोरी भागात अनेक भंगार विक्रीची दुकाने आली आहेत. चोरटे रिक्षांची चोरी करून अन्य भागात नेतात. रिक्षेचे सुट्टे भाग, रिक्षेची तोडफोड करून रिक्षा भंगारवाल्यांना विकतात. किंवा या रिक्षा इतर जिल्ह्यात नेऊन त्या कमी किमतीला विकल्या जातात. डोंबिवली परिसरात भंगार विक्रीची दुकाने वाढल्याने अशा चोऱ्या वाढल्या आहेत, असे रिक्षा चालकांनी सांगितले.
रिक्षा चोरीला गेल्याने रिक्षा चालकांचा दैनंदिन रोजगार बुडत आहे. काही रिक्षा चालकांनी कुटुंब गाडा चालविण्यासाठी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.