
ठाणे- मंगळवारी मध्यरात्री वागळे इस्टेट भागातील किसननगर परिसरात असलेल्या नंदादीप इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इमारतीतील १७कुटुंबांना तत्काळ हाजूरी रेंटल येथे स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
किसन नगर भागातील पंचपरमेश्वर मंदिरा जवळ नंदादीप ही ५० ते ६० वर्षे जुनी इमारत आहे. ही इमारत तीन मजली आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील जिन्याची बाल्कनी आणि तीन छतांचा काही भाग मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अचानक कोसळला.
या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी ठाणे महापालिका अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी- कर्मचारी, अग्निशमन दल, टीडीआरएफचे जवान, श्रीनगर पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि महावितरणचे कर्मचारी यांनी तातडीने धाव घेतली.