काटई बदलापूर रोडवर खोनी गाव येथे टेम्पोची वीजेच्या खांबाला धडक……
अमित जाधव-संपादक
*काटई बदलापूर रोडवर खोनी गाव येथे टेम्पोची वीजेच्या खांबाला धडक……
काटई ते बदलापूर रस्त्यावरील खोणी-तळोजा मार्गावर शुक्रवारी पहाटे भरधाव वेगात असलेल्या एका टेम्पो चालकाने या रस्त्यावरील महावितरणच्या उच्च दाब वीज वाहिनीच्या खांबाला जोरदार धडक दिली. टेम्पोच्या धडकेत खांब वाकला. काही क्षणात या वीज वाहिनीवर अवलंबून असलेल्या खोणी, तळोजा परिसरातील गावांचा वीज पुरवठा खंडित झाला.
टेम्पोची वेगाने धडक वीजेच्या खांबाला बसल्याने पहाटे मोठ्याने आवाज या भागात झाला. त्याच बरोबर वीज वाहिन्यांचे घर्षण होऊन विजेचे लोळ उडाले. पहाटेच्या साखर झोपेत असलेले रहिवासी आवाजाने जागे झाले. सिलिंडर स्फोट, कंपनीत कोठे स्फोट झाला आहे का अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू झाली.
या रस्त्याच्या परिसरात असलेले हॉटेल, ढाबे चालक, तेथील कर्मचारी जागे झाले. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले. टेम्पोने एका वीज वाहक खांबाला जोराने धडक दिल्याचे दिसले. टेम्पोचा पुढील भाग चेंदला आहे. घटना घडताच परिसरातील लोकांकडून मारहाण होईल या भीतीने टेम्पो चालक पळून गेला.
महावितरणचे अधिकारी सकाळी घटनास्थळी आले. त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. टेम्पोच्या वाहन क्रमांकावर टेम्पो मालकाचा शोध घेतला जात आहे. टेम्पो चालकावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. टेम्पो चालकाला डुलकी लागली असावी, त्यामधून हा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वाकलेला वीजेचा खांब काढून टाकण्याचे काम सुरू केले आहे. पहाटेच्या वेळेत ही घटना घडली. यावेळेत वाहनांची गर्दी नसते. त्यामुळे वाहन कोंडीचा प्रश्न आला नाही. आता खांब काढण्याचे काम रस्त्याच्या एका बाजुने सुरू आहे. त्यामुळे तेथे वाहतूक कोंडीचा प्रश्न नाही, असे कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी सांगितले.
महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले, खोणी परिसराचा वीज पुरवठा वीज खांब कोसळल्याने बंद पडला होता. वीज पुरवठा बंद झालेल्या गावांना तातडीने पर्यायी वीज वाहिनींवरून वीज पुरवठा देण्यात आला आहे. कोसळलेला खांब काढण्याचे काम सुरू आहे. संबंधित टेम्पो चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. टेम्पो मालकाचा शोध घेऊन पोलीस योग्य ती कार्यवाही करतील.