बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन….

अमित जाधव - संपादक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. शाळेत व महाविद्यालयात अस्पृश्यतेमुळे त्यांचा, अनेकदा मानभंग झाला होता व त्यांच्या रास्त हक्कांपासून त्यांना वंचित केले गेले होते. त्यांचे माध्यमिक व महाविदयालयीन शिक्षण मुंबईत झाले. बडोदयाचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या आर्थिक साहाय्याने परदेशात जाऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम्. ए., पीएच्. डी. या पदव्या मिळवल्या आणि ते बॅरिस्टरही झाले. मुंबईतील सिडनहॅम महाविदयालयात काही काळ ते प्राध्यापक होते. सरकारी विधी महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले व नंतर काही वर्षे प्राचार्यपदही सांभाळले.भीमरावांनी आपल्या समाजासाठी वकिली करण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्यांनी २० जुलै १९२४ रोजी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापन केली. ‘शिकवा, चेतवा व संघटित करा’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. डॉ. आंबेडकरांना आपल्या निद्रिस्त समाजाची अस्मिता फुलवायची होती. त्यासाठी ते त्या ‘मूक समाजाचे नायक’ झाले. त्यांनी आपल्या या अशिक्षित बांधवांना एक दिव्य संदेश दिला, ‘वाचाल, तर वाचाल.’ वसतिगृहे स्थापन करून अस्पृश्य मुलांना निवासाची सोय पुरवून त्यांना शिक्षण देणे, वाचनालये काढणे, रात्रीच्या शाळा भरवणे, तरुणांसाठी क्रीडामंडळे चालवणे अशा कार्यांवर ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’चा भर होता. आपल्या उत्तर आयुष्यात बाबासाहेबांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ ही संस्था स्थापन करून मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय व औरंगाबाद येथे ‘मिलिंद महाविदयालय’ या संस्था काढल्या व नावारूपास आणल्या.

दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १९२७ मध्ये डॉ. आंबेडकरांनी महाडला ‘चवदार तळे’ येथे अहिंसक सत्याग्रह केला. अस्पृश्यांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशासाठीही सत्याग्रह करण्यात आला.डॉ. आंबेडकरांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळावर काम केले. १९४२ साली ते केंद्र सरकारात मजूरमंत्री होते. गोलमेज परिषदेसाठी ते दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले आणि स्वातंत्र्योत्तर काळात ते स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार झाले. आपल्या बांधवांना जागृत करण्यासाठी त्यांनी विद्वत्तापूर्ण असे अनेक ग्रंथ लिहिले. मुंबईतील त्यांच्या ‘राजगृह’ या निवासस्थानी त्यांचा स्वत:चा फार मोठा ग्रंथसंग्रह होता. बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला.६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे डॉ. आंबेडकरांचे महानिर्वाण झाले. मात्र पददलित समाजाला ‘भीमशक्ती’ प्रदान करूनच डॉ. भीमराव आंबेडकर हा आदित्य अस्तंगत झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे