*⭕️जेष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन.*
मुंबई, ता 11 जाने (संतोष पडवळ): ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने यांचं निधन झालं. मुंबईतील माहिम इथल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
चित्रपट लेखक ग. रा. कामत यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या. रेखा कामत आणि चित्रा नवाथे या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. या दोघी बहिणींनी मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजविला. मालिकांमध्ये ही त्यांनी काम केले. प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रपंच’ ही त्यांची पहिली मालिका. या मालिकेत त्यांनी साकारलेली ‘आक्का’ ही भूमिका त्याकाळी गाजली होती. ‘सांजसावल्या’ मालिकेतही त्यांनी काम केले. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधील ‘माई आजी’ तर प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. ‘आजी’ असावी तर अशी, अशी ओळख या मालिकेमुळे त्यांना मिळाली. नव्या पिढीलाही रेखा कामत हे नाव माहिती झाले. अनेक जाहिरातींमधूनही त्यांनी ‘आजी’ची भूमिका साकारली आहे. चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती अभिनयाच्या या चारही क्षेत्रांत त्यांनी भरपूर काम केले असले तरी नाटक हे त्यांच्या अधिक आवडीचे होते.