ताडीच्या अतिसेवनाने डोंबिवलीच्या कोपर गावांतील दोन तरुणांचा तडफडून मृत्यु,…
अमित जाधव-संपादक
*⭕️ताडीच्या अतिसेवनाने डोंबिवलीच्या कोपर गावांतील दोन तरुणांचा तडफडून मृत्यु,*
डोंबिवली, ता 11 जाने ( संतोष पडवळ) : ताडीचे अतिसेवन केल्याने झालेल्या विषबाधा होऊन दोन तरुणांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीच्या कोपर गावात घडली आहे.
सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके अशी दोन मयत तरुणांची नावं आहेत. या दोघांपैकी स्वप्नील चोळके हा डोंबिवली शहर वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून कार्यरत असतांना गेल्या दोन महिन्यांपासून आजारी असल्याने तो सुट्टीवर होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विष्णू नगर पोलिसांनी ताडी विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ताडी विक्रेता फरार असल्याचे समजते .
डोंबिवली पश्चिमेतील कोपर गावात राहणारे सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके हे दोघे सोमवारी सायंकाळी आपल्या अन्य दोन मित्रांसह कोपर गाव रेल्वे रुळालगत असलेल्या ताडी सेंटरवर ताडी पिण्यासाठी गेले होते. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन पडमुख, स्वप्नील चोळके घरी परतत असताना रस्त्यातच त्यांना त्रास जाणवू लागला.
त्यांच्या मित्रांनी दोघांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला . या प्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात ताडी विक्रेता रवी भटने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या फरार ताडी विक्रेत्याचा पोलिस शोध घेत आहेत .
या दोन तरुणांचा मृत्यूला ताडीचे अतिसेवनच कारणीभूत असल्याचे डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज असल्याचे सांगितले असल्याची माहीती विष्णुनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भालेराव यांनी दिली आहे . मृत युवकांच्या पालकांनी ताडी विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हीच ताडी पिऊन अन्य दोघांनाही त्रास जाणवू लागला होता, परंतु त्यांचेवर वेळीच उपचार सुरु झाल्याने त्यांचे प्राण वाचले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे