बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

सावधान.. हा चोर भिकारीच्या वेशात लोकल ट्रेन मध्ये फिरून करतो मोबाईल लंपास…

अमित जाधव - संपादक

मुंबई लोकलमधून दररोज जवळपास 80 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या फायदा घेऊन किंवा प्रवासी ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवाशांच्या खिशातून मोबाइल लंपास केला जातो. अशा मोबाइल चोरांवर पोलिसांची करडी नजर असते. मात्र, आता चोरांनी नवा फंडा शोधून काढला आहे. वांद्रे पोलिसांनी 32 वर्षांच्या एका मोबाइल चोराला अटक केली आहे. त्याच्याजवळ 25 पेक्षा जास्त मोबाइल सापडले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव शब्बीर अमिरजान शेख असं असून तो नालासोपाराचा रहिवाशी आहे. लोकल ट्रेनमध्ये तो गाणं म्हणत भिक मागायचा. तर त्याचवेळी गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल चोरी करायचा. शेख लोकल ट्रेनमध्ये प्रवेश करताना गाणं म्हणायचा आणि प्रवाशांकडून भीख मागायचा. त्यामुळं प्रथमदर्शनी तो भिकारी असल्याचे प्रवाशांना वाटायचे. मात्र, जस जशी गर्दी वाढायची तेव्हा या गर्दीचा फायदा घेऊन तो प्रवाशांचे मोबाइल चोरी करायचा. 6 ते 8 यावेळेत लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते याचाच फायदा घेऊन तो चोरी करायचा.

रेल्वे पोलिसांनी शेख विरोधात जवळपास 25 हून अधिक तक्रारी दाखल केल्या आहेत. वडाळा, दादर, वसई, बांद्रा, बोरीवली, कुर्ला, अंधेरी या स्थानकातील पोलिस ठाण्यात सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. वांद्रे सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी)चे सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) एबी सदीगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 नोव्हेंबर रोजी आरोपीने दादर स्थानकावरुन विरार ट्रेनमध्ये प्रवेश केला आणि एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडे असलेला आयफोन चोरला.

लोकलमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेत त्याने आयफोन चोरला. पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना शेखवर संशय आला. दादर रेल्वे स्थानकात प्रवेश करताना तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा माग घेत शनिवारी 9 डिसेंबर रोजी दादर रेल्वे स्थानकावरुन त्याला अटक केली, अशी माहिती एएसआय सदीगल यांनी दिली आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शेख हा अट्टल गुन्हेगार आहे त्याला अनेकदा अटक करण्यात आली आहे. विरार आणि पनवेलमार्गे जाणाऱ्या लोकलमध्ये तो संध्याकाळी 6 ते रात्री 8 दरम्यान गाणी गात प्रवाशांकडून भीक मागतो आणि गर्दीचा फायदा घेत मोबाइल फोन लंपास करतो. यापूर्वी शेखला वडाळा जीआरपीने पाच वेळा, दादर जीआरपीने पाचवेळा तर वसई जीआरपीने चार वेळा, अंधेरी जीआरपीने तीनदा, कुर्ला जीआरपीने दोनदा आणि बोरिवली आणि वांद्रे जीआरपीने प्रत्येकी एकदा अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे